सांगली : विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांची असुरक्षितता, गैरसोय होऊ देणार नाही, असे मत आमदार अरूण लाड यांनी गुरुवारी व्यक्त केले.
किर्लोस्करवाडी येथे सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि भुयारी पुलाच्या कामांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी व नियोजनातील कमतरता असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी ठिय्या आंदोलन करून सुरू असलेल्या नवीन उड्डाण पूल, भुयारी पूल, पादचारी पूल अशा कामांचा विरोध केला आहे. आज आमदार लाड यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
कामाच्या दर्जावर, स्थानिक नागरिकांच्या गैरसोयीवर तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक होणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य लोकांना त्रासदायक व जीवितास धोकादायक असणारा हा उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग चुकीचा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यासाठी तत्काळ बैठकीची मागणी करण्याचे आश्वासन आमदार लाड यांनी यावेळी आंदोलकांना दिले.
यावेळी परिसरातील कुंडल गावचे सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच किरण लाड, श्रीकांत लाड, विजय लाड, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार तसेच इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते.