Sunil Tatkare Chhava Sanghatana: राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कोकाटे मोबाईलमध्ये पत्ते खेळत असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. अशात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना दिले.
निवेदन देताना छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणही मारहाण करत असल्याचे दिसत आहेत.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन देताना छावा संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, “त्यांना हे पत्ते द्यावे आणि घरी बसून खेळायला सांगावे. विधानभवन हे शेतकरी, कष्टकरी आणि राज्यातील जनतेसाठी कायदे करण्यासाठीचे सभागृह आहे. तिथे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. ती पत्ते खेळण्याची जागा नाही. ते तुमच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांना तुम्ही मंत्री केले आहे. अशा मंत्र्यांना पदावर ठेऊ नका, यामुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे.”
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण म्हणाले की, “आमचे म्हणणे असे आहे की, जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांची मागणी घेऊन आले होते, त्यांनी ती संवैधानिक पद्धतीने मांडायला पाहिजे होती. पण यावेळी त्यांनी ज्यापद्धतीने मागणी केली आणि त्यानंतर असंवैधानिक भाषेचा वापर केला, त्यावेळी अशा प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे. यावेळी तटकरे साहेबांनी त्यांचे निवेदन स्वीकारले, त्यांची समजूत काढली, पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या अंगावर पत्ते फेकले. तसेच असंवैधानिक भाषा वापरली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अशी प्रतिक्रिया उमटली.”
दरम्यान, सुनील तटकरे यांनी हा घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे म्हणत पोलिसांनी त्यांची कारवाई करावी, असे म्हटले आहे.