Devendra Fadnavis On BJP Nishikant Dubey : ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर परप्रांतीयांच्या मुद्यांवरून भाजपा आणि मनसे नेत्यांमध्ये जोरादार आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी या वादाच उडी घेत ठाकरे बंधूंना डिवचलं. दुबे यांनी एक्सवर एक पोस्टही केली होती. तसेच काही माध्यमांशी बोलताना दुबे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय’, अशा प्रकारचं विधान दुबे यांनी केलं होतं.

खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यासह भाजपावर टिकेची झोड उठली होती. त्यानंतर आता निशिकांत दुबे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे. निशिकांत दुबे यांचं वक्तव्य हे मराठी माणसांसाठी नाही तर एका संघटनेच्या संदर्भात होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, तरीही अशा प्रकारचं विधान करणं चुकीचं असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“खासदार निशिकांत दुबे यांचं वक्तव्य जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. मराठी माणसांबाबत त्यांनी सरसकट असं वक्तव्य केलेलं नाही. मात्र, तरीही माझं मत असं आहे की अशा प्रकारचं बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसांचं योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

निशिकांत दुबे यांची पोस्ट काय होती?

“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं होतं. तसेच निशिकांत दुबे यांनी ही पोस्ट राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाला टॅग केली होती.

निशिकांत दुबे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

भाजपा खासदार निशिकांत दुबे एएनआयशी बोलताना म्हणाले होते की, “तुम्ही काय म्हणता की मराठी बोलावं लागेल? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? येथे टाटा, बिर्ला, रिलायन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोणतंही युनिट नाही. टाटांनी तर पहिली फॅक्टरी बिहारमध्ये बनवली. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणता टॅक्स भरता? तुमच्या जवळ कोणती इंडस्ट्री आहे?,” असं दुबे यांनी म्हटलं होतं.

“जर तुमच्यात जास्त हिंमत असेल तर उर्दू भाषकिांना मारहाण करून दाखवा. उर्दू, तमिळ आणि तेलुगू बोलणाऱ्यांनाही मारहाण करून दाखवा. जर तुम्ही इतके मोठे ‘बॉस’ असाल तर महाराष्ट्रातून बाहेर पडा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या. मग आपटून आपटून मारू. आम्ही देखील मराठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांचा आदर करतो. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे करत आहेत, ते अयोग्य आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहिमला जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिक लोकांना मारहाण करून दाखवावी”, असं खासदार निशिकांत दुबे म्हणाले होते.