उत्तर भारतीयांनी मुंबईच्या लौकिकात आपल्या कार्याने भरच घातली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचे कौतुक केले आहे. भाषा हे संवादाचे माध्यम असते. मुंबईत मराठी आणि हिंदी भाषिकांच्या संस्कृतीचे उत्तम अभिसरण झाल्याचे आढळते, असे मतही  त्यांनी मांडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने वाद निर्माण झाला असून मनसेने या विधानावरुन टीका केली आहे.

घाटकोपर स्टेशन रोडवरील चौकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  शिक्षणमहर्षी आय.डी. सिंह असे नामकरण करण्यात आले आहे. बुधवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांबाबत मत मांडले. मराठी संस्कृतीशी एकरूप होऊन उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे. त्यामध्ये आय. डी. सिंह यांच्या सारख्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते, असे त्यांनी सांगितले.

आय. डी. सिंह यांचे जीवन शिस्तबद्ध होते. त्यांनी हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळे आज हिंदी विद्या प्रचार सभा या संस्थेचा वटवृक्ष झाला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सिंह यांच्या कार्याचा गौरव केला. मुंबईत मराठी आणि हिंदी भाषिकांच्या संस्कृतीचे उत्तम अभिसरण झाले असून सण- उत्सव या माध्यमातून त्यामध्ये भर पडल्याचे दिसते, असे त्यांनी नमूद केले. चार पिढ्यांहून अधिक काळ मुंबईत वास्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीयांची पिढी आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली, असे त्यांनी सांगितले. विविध राज्यांमधून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, असे त्यांनी म्हटले आहे. हिंदी हायस्कूलच्या बैजनाथ साबू सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार राम कदम आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन मनसे आक्रमक झाली आहे. भाजप नेत्यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांचे कौतुक केल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी भाजप खासदार पूनम महाजन यांनी देखील उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहेत, असे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानावरुन मनसेने टीका केली असून भाजप विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.