CM Devendra Fadnavis to Uddhav Thackeray: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ संपत आहे. त्यांचे या टर्ममधील शेवटचे अधिवेशन असल्यामुळे आज त्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यांच्या निरोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर मंत्री, तसेच विरोधी बाकावरून उद्धव ठाकरे आणि इतर सदस्यांनी भाषणे केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून एक विधान केले. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अंबादास दानवे यांच्या कारकिर्दीबद्दल सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षनेता म्हणून दानवे यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीदेखील काही काळ हे पद भूषविले आहे. माझ्या जीवनातला जास्त काळ विरोधी पक्षात गेला आहे. विरोधी पक्षात कसे काम करायचे यातच माझी पीएचडी झाली आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, जसा विरोधात काम करण्याचा माझा अनुभव आहे. तसा शासनात काम करण्याचाही आता १० वर्षांचा अनुभव आहे. अंबादास दानवे यांनीही कधी आक्रमक होत, कधी गौप्यस्फोट करत त्यांनी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. या टर्मचा त्यांचा निरोप समारंभ असला तरी आपल्या शुभेच्छा आहेत की, त्यांनी पुन्हा सभागृहात यावे.”
उद्धवजी २०१९ पर्यंत तरी…
“दानवे यांनी पुन्हा सभागृहात आल्यानंतर याच पदावर काम करावे, असे काही नाही. आता मी असे म्हटलो की, उद्धवजी म्हणतील, आम्ही पळवा, पळवी करतो”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणताच.
समोरच्या बाकावरून उद्धव ठाकरे यांनी काहीतरी टिप्पणी केली.
यानंतर फडणवीस म्हणाले की, उद्धवजी २०२९ पर्यंत तरी आमचा त्याबाजूला (विरोधक) येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल.
अंबादास दानवे कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हा हिंदुत्ववादी आहे. त्यांचा हा विचार ते सोडणार नाहीत. या विचाराच्या दिशेनेच ते सातत्याने काम करत राहतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच पुढचा विरोधी पक्षनेता कोण? याचाही निर्णय विरोधक आणि सभापती मिळून घेतील.
दानवे तुम्ही पुन्हा येईन म्हणा… – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनीही भाषण केले. ते म्हणाले, “विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी अंबादास दानवे या सभागृहातील आपल्या कारकिर्दीची पहिली टर्म पूर्ण करत आहेत. त्यामुळे अंबादास दानवे तुम्ही जोरात पुन्हा येईन म्हणा. या घोषणेला खूप महत्त्व आहे. पण त्याच पक्षातून पुन्हा येईन म्हणा. अंबादास दानवेंचे कौतुक ऐकायला आज बरं वाटले. कारण आज कौतुक करणारे दानवेंची उमेदवारी जाहीर केली, तेव्हा वेगळाच चेहरा करून बसले होते.”
मुख्यमंत्री आता सभागृहात बसलेले नाहीत. पण त्यांना मी मोकळ्या मनाने धन्यवाद देतो आणि प्रांजळपणे कबूल करतो की, तुम्ही संघाच्या किंवा भाजपाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्यासारखेच ते मला धन्यवाद देतील की नाही, माहीत नाही. कारण माझ्याकडूनही त्यांनी काही लोक घेतले, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.