काँग्रेसच्या जागा कमी करण्यात राहुल गांधींची मदत नक्की मिळेल अशी खिल्लीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवली आहे. “राहुल गांधींना आपण महाराष्ट्रात येऊन कितीही डोकं आपटलं तरी काही फरक पडणार नाही माहिती होतं म्हणून ते बँकॉकला फिरायला गेले होते,” असाही टोला यावेली त्यांनी लगावला. कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राहुल गांधी महाराष्ट्रात नाहीत, मला वाटलं हरियाणात असतील पण तिथेही नव्हते. म्हटलं दिल्लीला असतील पण तिथेही नव्हते. वायनाड गेले असावेत असं वाटलं पण तिथेही नव्हते. चौकशी केली असताना ते बँकॉकला गेले असल्याचं कळलं. त्यांच्या नेत्यांना फोन करुन महाराष्ट्रात या अशी विनंती करावी लागली. आम्ही कोणता चेहरा घेऊन लोकांसमोर जाणार असा प्रश्न ते विचारत होते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. “काँग्रेसचे ४२ ते २४ होतील हे त्यांना माहिती आहे,” असा टोला फडणवीस यांनी मारला. तसंच राहुल गांधींची सभा झाल्याने मला आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. “राष्ट्रवादीत राहायला कोणी तयारच नाही. शरद पवारांची अवस्था शोलेतल्या जेलरसारखी झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली. पाच वर्षात जे केलं त्याचा हिशोब देण्यास मी तयार आहे, तुम्ही १५ वर्षांचा हिशोब द्या असं आव्हान यावेळी त्यांनी दिलं.

पाच वर्षाचा शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतो – देवेंद्र फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत एकूण मतदानाच्या ६० ते ७० टक्के मतं मिळतील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना यावेळी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “नितेश राणे आक्रमक आहेत, कारण ते नारायण राणेंच्या नेतृत्त्वात घडले आहेत. पण नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत घेतलं आहे. त्यांना आमच्या शाळेत संयम शिकवणार आहोत. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचं तिथं होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात निवडणुकीत कुठेही चुरस दिसत नाही असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. ही निवडणूक प्रेमाने, जनतेसोबत लढली पाहिजे असं सांगताना अनेक लोक चिथवण्याचा प्रयत्न करतील. जे जिंकणारे असतात त्यांनी वाघासारखं, मोठ्या मनानं वागायचं असतं असा सल्ला यावेळी देंवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis on congress rahul gandhi maharashtra assembly election sgy
First published on: 15-10-2019 at 16:01 IST