Sambhaji Brigade Name Controversy: गेल्या दोन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याची चर्चा चालू आहे. अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमानिमित्त प्रवीण गायकवाड आले असता त्यांना काळे फासण्यात आले, त्यांच्या डोक्यावर शाई ओतण्यात आली व त्यांना धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. या प्रकरणाचे पडासाद आज विधानसभेत पाहायला मिळाले. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. गायकवाड यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. खुद्द गायकवाड यांनीही हा दावा केला असून देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात सभागृहाला कारवाईची माहिती दिली.

प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक

सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये रविवारी फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका सत्काराच्या कार्यक्रमात प्रवीण गायकवाड यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रवीण गायकवाड तिथे आले असता शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांना काळे फासण्यात आले. तसेच, त्यांचे कपडेही फाडण्यात आले. ते पुन्हा गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना खेचून बाहेर काढले व धक्काबुक्कीही झाली. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेत विजय वडेट्टीवारांनी मांडला मुद्दा

दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात उमटत असताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा विधानसभेत मांडला. “हा विषय महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सभागृहात निवेदन करावं. अशा प्रकारे हल्ले करण्याची हिंमत होत आहे. प्रवीण गायकवाड यांचा काय दोष होता? त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच. अनेकांनी आपली नावं बदलून संभाजी ठेवली आहेत. त्यांना मारहाण झाली का?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

“ही संघटना अनेक वर्षांपासून काम करतेय. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊ छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर काम करणारी ही संघटना आहे. पण जे काही घडलंय, ते अमानुष आहे. प्रवीण गायकवाड यांना गाडीतून ओढलं. त्यांना काळं फासलं. कॉलर धरून खाली पाडलं. काळं फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला. हे सगळं पूर्वनियोजित होतं. त्यांना काळं फासण्याचं काहीही कारण नव्हतं”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

हल्लेखोराची गुन्हेगारी पार्श्वभूमी

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं वडेट्टीवार यांनी सभागृहाला सांगितलं. “ज्यानं हे कृत्य केलं, त्याचा यामागे उद्देश काय? या माणसाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. पिस्तुल बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. सख्ख्या चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी तो तुरुंगात होता”, असं वडेट्टीवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण गायकवाड मारहाण प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं निवेदन

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक व धक्काबुक्की प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. “मी स्वत: या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली. वस्तुस्थिती अशी आहे की या आरोपींनी हा हल्ला केला. संभाजी नाव का ठेवलं? छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं? असा वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली. पोलीस तातडीने तिथे पोहोचले. पोलिसांनी गायकवाडांना फिर्याद द्यायची विनंती केली. ते तयार नव्हते, तरी पोलिसांनी फिर्याद घेतली. आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. त्यांना अद्याप सोडण्यात आलेलं नाही. जी घटना घडली त्यानुसार योग्य ती कलमं लावून कारवाई केली जाईल”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.