Fadnavis and Shinde Cold War : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असं असताना राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यातील मोठ्या महापालिकांप्रमाणे आता छोट्या म्हणजेज ड वर्ग महापालिकांमध्ये देखील आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, या निर्णयाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाचा विरोध असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची पद्धत कायम ठेवण्याचा आग्रह नगरविकास विभागाचा असल्याचं बोललं जात आहे.

यावरून महायुतीत शीतयुद्ध सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय नेमकं काय आहे? याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“सर्व महापालिकांमध्ये फक्त आयएएस अधिकारी असतील असं कुठेही ठरलेलं नाही. मात्र, असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कमिशनरच्या जागा आयएएससाठी आरक्षित आहेत. पण तरीही आपण त्या ठिकाणी आयएएस अधिकारी नियुक्त केला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या आयएएसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये? त्यामुळे अशा नोटिफाईड ठिकाणी आयएएस अधिकारीच नियुक्त करण्यात आले पाहिजेत असा आमचा आग्रह आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“आमच्यात असं शीतयुद्ध वैगेरे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना बरोबर घेऊन काम करतात. त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. तसेच लोकाभिमुख कारभार व्हावा, असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो. एकनाथ शिंदे यांचा देखील आपण मुख्यमंत्री पदाची कार्यकाळ पाहिलेला आहे. त्यामुळे लोकाभिमुख कारभार व्हावा या अनुषंगाने आमचा प्रयत्न असतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.