Devendra Fadnavis On Raj Thackeray : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. तसेच पुण्यातील एका मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनीही मत चोरीच्या आरोपावर भाष्य केल्याची चर्चा आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. विरोधक जो पर्यंत त्यांच्या पराभवाचं आत्मचिंतन करणार नाहीत, तो पर्यंत हे निवडून येणार नाहीत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरे यांच्या भेटीबाबत महत्वाचं विधानही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“महाराष्ट्रात २०१४ मध्ये काँग्रेसचं राज्य होतं. देशातही त्याआधी काँग्रेसचं राज्य होतं. १५-१५ वर्ष काँग्रेस सरकार होतं. मात्र, तरीही निवडणुकीत आपण का हारतो? जनतेने आपल्याला का नाकारलं? हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम हे करत राहतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाहीत”, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

राज ठाकरेंच्या विधानाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मत चोरीच्या आरोपाबाबत पुण्यातील एका मेळाव्यात बोलताना भाष्य केलं असल्याचा प्रश्न माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “असं आहे की, दिल को बहलाने के लिए गालिब वो ख्याल अच्छा है, बस मै भी यही कहना चाहता हूं, ये अपना दिल बहला रहे हैं…, ते कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण तर निवडून येणारच होतो. पण आपल्या पराभवात काही तरी षडयंत्र आहे. कारण कार्यकर्ते सोडून जाऊ नये. मी त्यांना एवढंच सांगतो की जो पर्यंत ते त्यांच्या पराभवाचं आत्मचिंतन करणार नाहीत, तो पर्यंत हे निवडून येणार नाहीत. विरोधक जोपर्यंत खोट बोलत राहतील तो पर्यंत कधीही जिंकून येऊ शकत नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण भेटतं यावरून युती ठरत नसते. कोण भेटतं यावरून राजकारण होत नसतं. राजकारणात महायुती लढेल आणि महायुतीच जिंकेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.