राज्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जारी करण्यात आले. दरम्यान आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मदतीचा आढावा घेण्यात आला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी अजून ११ हजार कोटी रुपये रिलीज करण्यास मंजूरी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस काय म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आत्तापर्यंत सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या अंतर्गत ८ हजार कोटी रुपये रिलीज केले आहेत. जवळपास ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहचले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून ११ हजार कोटी रुपये रीलीज करण्याला मान्यता देण्यात आली. हे बजेटमधील पैसे नसल्याने याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. आता हेही पैसे पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचवण्याचे आदेश आम्ही दिले आहेत, अशा माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, आता दिला गेलेला निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेला आहे. काही ठिकाणी तो अंशतः गेला आहे. याचे कारण म्हणजे आम्ही एक निर्णय घेतला होता, की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सर्व याद्यांसाठी थांबायचे नाही. त्यामुळे कोणी शंका बाळगण्याची गरज नाही की आम्हाला तर एनडीआरएफचे पैसे मिळाले पण १० हजार मिळाले नाहीत. १० हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत. ज्याना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही टाकतोय.
पुढच्या १५ ते २० दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील. ९० टक्क्यांपर्यंत शेतकरी आम्ही या १५ ते २० दिवसांत कव्हर करू. निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास २१ हजार कोटींचं पॅकेज आहे. त्यापैकी ८ हजार कोटी आधीच रिलीज केले आहेत. ११ हजार कोटी आज रिलीज करण्यासाठी दिले आहेत. पंधराशे कोटी स्वतंत्र्यपणे रिलीज केले जातील असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. .
