राज्याच्या उपराजधानीतील कारागृहातून पाच कैद्यांनी केलेली पलायन, कारागृहात सापडलेले मोबाईल यासर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी नागपूरमधील कारागृहाला अचानक भेट दिली. कारागृहातील प्रशासकीय व्यवस्थेत संपूर्ण सुधारणा करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. कारागृहातील सुरक्षेसाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

याच महिन्यात नागपूरमधील कारागृहात मोबाईल हॅण्डसेट सापडले होते. चार एप्रिलला अतिरिक्त महासंचालकांनी अचानकपणे दिलेल्या भेटीवेळी त्यांनी केलेल्या पाहणीत २६ मोबाईल सापडले होते. त्यानंतर गेल्या शुक्रवारी केलेल्या पाहणीमध्येही नऊ मोबाईल सापडले होते. याच कारागृहातून गेल्या महिन्यात पाच कैद्यांनी पलायन केले होते. या पलायनाला कारागृह प्रशासनातील काहीजणांची मदत होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांनी केलेल्या चौकशीनंतर अधीक्षक आणि तीन अधिकाऱयांचे निलंबन करण्यात आले होते.
फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या शहरातील कारागृहामध्येच अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यामुळे आणि त्यांच्याकडेच गृहमंत्रीपद असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावरही टीका केली होती.