वेदान्त समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आलं. त्यानंतर रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्क प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला आहे.

“आमचं सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले. वेदान्त समूह दीड वर्षे राज्यातील प्रकल्पासाठी प्रयत्न करत होता. मात्र, त्यांच्या मागणीबाबात आमचे सरकार आल्यावर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेतली. त्यांना पाहिजे ती सबसिडी देण्यात आली. पण, दीड वर्ष महाविकास आघाडीने वेदान्त समूहाला सहकार्य केलं नाही. आमचे सरकार येण्यापूर्वीच वेदान्त समूहाने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला,” असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – “बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर नवा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वेदान्त समूह राज्यात दुसरा प्रकल्प उभा करणार”

“राज्यात मोठे उद्योग आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे. वेदान्त समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल राज्यात दुसरा प्रकल्प उभा करणार आहेत. आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये पडणार नाही,” असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.