मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मराठा समाजाच्या जुन्या कुणबी नोंदी असल्याचा विषय समोर आला. त्यानंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भाषण करतानाच सांगितले की, मी कुणबी दाखला घेणार नाही. हाच प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका शब्दात उत्तर देऊन विषय संपविला. तर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली.

हे वाचा >> “हे धंदे आता बंद करा…”, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात रंगला कलगीतुरा

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो. माझ्याकडे जो दाखला आहे, त्यावर मराठा लिहिलेले आहे. मी शेती करत असलो तरी कुणबी दाखला घेणार नाही.

आमच्यापेक्षा मराठा समाज महत्त्वाचा – अजित पवार

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर ‘नाही…’ असे थेट उत्तर देऊन कुणबी दाखला घेणार नसल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकार म्हणून आम्हाला एक भूमिका स्पष्ट करायची आहे की, आम्हाला कुणबी दाखला मिळण्याऐवजी गरीब मराठ्याच्या कुटुंबांना कुणबी दाखला मिळणे गरजेचे आहे.

आणखी वाचा >> मराठा आरक्षण: मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमवर एकनाथ शिंदेंची जाहीर विनंती, म्हणाले…

मनोज जरांगेंनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी – मुख्यमंत्री

“हे सरकार शब्द देणारं आणि शब्द पाळणारं सरकार आहे. त्यामुळे कधी आचारसंहिता लागणार? हे आम्हाला माहीत आहे. गेल्या २० वर्षांपासून १ मार्चनंतरच आचारसंहिता लागते. त्यामुळे आचारसंहितेच्या नावाखाली मराठा आरक्षणाचा विषय अडवला जाईल, असे कोणतेही काम आम्ही करणार नाही. त्यामुळे आम्ही जो शब्द दिला आहे, त्यावर आम्ही कायम राहणार आहोत”, अशी भूमिका फेब्रुवारीमधील मराठा आरक्षणासाठीच्या अधिवेशनाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. तसेच “मनोज जरांगे पाटील यांनादेखील आम्ही जाहीरपणे विनंती करतो की, आमचे काम आपल्यासमोर आहेृ. सर्व निर्णय आम्ही आपल्यासमोरच घेतले आहेत. त्यामध्ये आम्ही कुठेही आडपडदा ठेवला नाही. त्यामुळे जरांगे यांनी सरकारवर विश्वास ठेवून श्रद्धा आणि सबुरी ठेवावी,” अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना खोचक टोला

उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांच्या अधिवेशनात दोन दिवसांची हजेरी लावली होती, त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढणारे वक्तव्य केले. “नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशनाचा एकही मिनिट वाया गेला नाही, मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून दोन्ही सभागृहाचं कामकाज थांबलं, असं एकदाही झालं नाही. दुसरं म्हणजे, या अधिवेशनाचं वैशिष्टं असं की, मा. उद्धव ठाकरे यांचे तब्बल दोन दिवस आम्हाला दर्शन घडलं. हेही या अधिवेशनाचं फलितच मानलं पाहीजे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.