महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतली आहेत. असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार काम करतात, अशी चर्चा सोशल मीडियात रंगत आहेत.

काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एका कागदावर काहीतरी मजकूर लिहून एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी कागदावरील मजकूर वाचून पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ही सर्व घटना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणात असून त्यांचेच आदेश पाळतात, अशी चर्चा सोशल मीडियात रंगली होती.

हेही वाचा- …अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

यानंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या कानात कुजबूज करताना दिसत आहेत. “एमएमआरडीएचा विषय राहिला” अशी कुजबूज देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

हेही वाचा- संजय राऊतांच्या ‘एक दूजे के लिए’ टीकेवर एकनाथ शिंदेंचा टोला; म्हणाले, “अरे बाबा आता…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती माध्यमांना दिली. यावेळी औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.