शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत पक्षातील बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. बंडखोरांनी मी रुग्णालयात बेशुद्ध असतानाही सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच बंडखोरी करणारे केवळ पालापाचोळा आहे. त्यांची पानगळ होऊन पक्षाला नवीन पालवी फुटेल असा टोलाही लगावला. यावर आता बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या. पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे.”

“पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार”

“आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर दीपाली सय्यदांची संजय राऊतांकडे मागणी; म्हणाल्या, “त्यांनी एकनाथ शिंदे…”

स्मिता ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “माझी भूमिका ज्यांना पटली ते लोक मला भेटत आहे.”

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पानगळ म्हणतो. त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काडय़ा राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी ‘पालापोचाळा’ म्हणत टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आमची लायकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात”

“खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात. म्हणजे नवी पालवी फुटेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.