महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या दोन पदांशिवाय मंत्रीमंडळातील इतर कोणतंही नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे नेमकं राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात कोण असणार? शिंदे गट आणि भाजपा यांच्यात मंत्रीपदांची वाटणी कशी होणार? या मुद्द्यांवर जोरदार चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. कालपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सूतोवाच दिले आहेत.

“अधिवेशनापूर्वी शपथविधी झाले असतील”

येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचे शपथविधी झाले असतील, असं एकनाथ शिंदे यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले आहेत. “आषाढी एकादशी झाल्यानंतर मुंबईत भेटून यावर चर्चा करू आणि मंत्रिमंडळ विस्ताराविषयी निर्णय घेऊ. १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. पण पावसाळी अधिवेशनाच्या आधी शपथविधी होणार आहेत”, असं ते म्हणाले.

“आम्ही नियमानुसार सगळं केलंय”

शिंदे गट आणि भाजपा युतीचं सरकार बेकायदेशीरपणे सत्तेत आलं असल्याचा दावा करत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना आम्ही सगळं नियम आणि कायदे पाळूनच केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “आम्ही शिवसेना आहोत. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमच्या गटाला मान्यता दिली आहे. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही”, असं ते म्हणाले.

“कसले खोके? मिठाईचे का?”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला!

दिल्ली दौऱ्यात फक्त सदिच्छा भेट!

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गेल्यापासून भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असताना ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं या दोघांनीही सांगितलं आहे. “एका विचारातून, बाळासाहेबांच्या भूमिकेच्या अजेंड्यातून या सगळ्या घडामोडी झाल्या. लोकांना हवी होती अशी लोकांच्या मनातली सत्ता, सर्वसामान्य लोकांचं सरकार अशी भूमिका घेऊन सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे वरीष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही आलो आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे सरकार अडीच वर्ष पूर्ण करेलच एवढी कामं आम्ही करू. पुढची निवडणूकही आम्ही जिंकू आणि २०० आमदार निवडून आणू”, असा निर्धारही एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलून दाखवला.