ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आप्पासाहेबांचा गौरव केला आहे. तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखादरम्यान आप्पासाहेबांनी कशी मदत केली याचीही आठवण उपस्थितांना सांगितली.

हेही वाचा >> “छत्रपतींची जगदंब तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात दर्शनासाठी आणणार”, सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी, ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या कुटुंबांचं मोठं योगदान आहे. उद्ध्वस्त होणारी लाखो कुटुंब, भरकटणाऱ्या कुटुंबांना दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केलं. आता सचिनदादा त्यांचं कार्य पुढे नेत आहेत. या लाखो कुटुंबामध्ये माझंही एक कुटुंब होतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “माझ्या कुटुंबावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला. तर, आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री सदस्य म्हणून उभा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आप्पासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. मी हे कदापि विसरू शकणार नाही. असे लाखो कुटुंब उद्ध्वस्त होत असताना आप्पासाहेबांनी दिशा देण्याचं काम केलं म्हणून हा महासागर येथे उपस्थित आहे”, अशी कृतज्ञ भावनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.