कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काल(सोमवार) काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर महामार्गावर जुनोनी येथे पायी दिंडीत कार घुसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

याशिवाय ‘कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने धडक दिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृत वारकरी बांधवांच्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून जखमी वारकरी बांधवांना तातडीने योग्य ते उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरज-पंढरपूर महामार्गावरील सांगोल्यातील जुनोनी येथे हा अपघात झाला. अपघातातील सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत. कार्तिकी एकदशीनिमित्त ३२ वारकरी पायी पंढरपूरला जात होते, तेव्हा हा अपघात घडला.