scorecardresearch

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मराठी माणसाच्या मेहनतीवरच…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Bhagat Singh Koshyari Eknath Shinde
भगतसिंह कोश्यारी व एकनाथ शिंदे

गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी (३० जुलै) नाशिकल जिल्ह्यात मालेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.”

“कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे”

“राज्यपालांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खुलासा केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यपाल हे एक मोठं पद आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली”

“आमची स्पष्ट भूमिका आहे की मराठी माणसाचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. या मुंबईत इतर राज्यातील लोकही रोजगार करतात. इतर समाजाचे लोकही व्यवसाय, व्यापार करतात. परंतु, मुंबईत जे काही सामर्थ्य आहे, महत्त्व आहे त्यामुळेच हे होतं. याचं श्रेय इतर कुणालाही घेता येणार नाही. मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेचा कुणालाही अवमान करता येणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून मराठी माणसाच्या मागे आहोत,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

“मुंबईने अनेक संकटं पाहिली, मात्र बाळासाहेब ठाकरे कायम मुंबईच्या पाठिशी राहिले”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांनी मराठी माणसाला न्यायहक्क मिळवून देण्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे मुंबईवर अनेक प्रसंग आले, मुंबईने अनेक संकटं पाहिली. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम मुंबईच्या पाठिशी उभे राहिले. कितीही संकटं आले तरी मुंबई थांबत नाही. मुंबई २४ तास सुरू असते. मुंबई कोट्यावधी लोकांना रोजगार देते. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मुंबईच्या माध्यमातून सुटत असतो.”

“शिवसेना म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही”

“असं वक्तव्य करण्याचा कुणालाही अधिकार नाही. शिवसेना म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही. आम्हाला ते मान्य नाही. राज्यपालांनी त्यांचा अवमान करण्याचा कोणातही विचार नव्हता असा खुलासा केला आहे. मराठी माणूस आणि मुंबई सर्वोच्च आहे असं त्यांनीच सांगितलं आहे. शिवसेनेची भूमिका मला सांगण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे यांची जी परखड भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “५० खोकेवाले आता…”, राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते होते?

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-07-2022 at 13:40 IST