गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक गडचिरोली जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी दरवर्षी पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आशा गावबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

हेही वाचा- “मी इतक्या लवकर जात नाही”, कॅन्सरचं निदान झाल्यावर शरद पवारांनी लावली होती डॉक्टरांसोबत पैज, सांगितला किस्सा!

मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

अतिवृष्टीमुळे कुठेही मदत कमी पडणार नाही याबाबतच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे मालमत्ता आणि जीवितहानी होणार नाही याची काळजीही घेतली जाणार आहे. पूरग्रस्त भागातील नागरीकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागातही विशेष सूचना दिल्या असल्याचे शिंदेनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रलंबित मेडिकल कॉलेज तातडीने सुरु करण्याचा निर्णय

तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित मेडिकल कॉलेज तातडीने सुरु करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी लागणारी पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना केल्या आहेत. याच बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जिल्हयातील पर्जन्यमान, पूरस्थिती, स्थलांतरीतांबाबतची माहिती सादर केली.

हेही वाचा- “भाजपा बंडखोर आमदारांना वापरून सोडणार”, कायदेशीर बाबींचा उलगडा करत अतुल लोंढेंचा दावा

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

त्या ४८ तासांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक ठिकाणी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. विदर्भातील पूरपरिस्थिती गंभीर असून आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.  हवामान खात्याने राज्यात मंगळवापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ६४ मिमी ते २०० मिमी पावसाचा अंदाज  आहे. त्यामुळे पूरस्थिती आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाने राज्यातील आठ जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) १३ तुकडय़ा, तर राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एसडीआरएफ) दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.