Tanaji Sawant Controversial Comment On Maratha Reservation: आपल्या कामाऐवजी वक्तव्य आणि विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहेत. रविवारी उस्मानाबादमध्ये ‘हिंदू गर्वगर्जना’ संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, अशा शब्दांमध्ये सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील असा शब्दही सावंत यांनी दिला. मात्र विरोधकांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेलं विधान वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

नक्की पाहा >> ‘हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर…’, ‘सणासुदीच्या काळात…’; ‘पाकिस्तान जिंदाबाद’वरुन राज ठाकरेंचा संताप

प्रमुख उपस्थिती म्हणून उस्मानाबादमधील कार्यक्रमाला सावंत यांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यकर्त्यांशी ‘हिंदू गर्वगर्जना’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. “आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे अशा मागण्या होत आहेत. अहो हे कोण आहेत? याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे तुम्हा-आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही,” असं म्हणत सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, “दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच” असंही म्हटलं. “आम्हाला आरक्षण पाहिजेच. मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय,” असं मराठा सामाजातील नेते असणाऱ्या सावंत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री २०२४ च्या आत आपल्याला पाहिजे तसं, टिकावू आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. हे वचन तुम्हाला देतो,” असंही सावंत यांनी भाषणादरम्यान म्हटलं.