scorecardresearch

Video : “…तेव्हा अजित पवारांना खरा धक्का बसेल”, मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा; ‘गद्दार’ शब्दावरूनही टोला!

देसाई म्हणतात, “कुणी कुणाला गद्दार म्हणावं? अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा की..!”

Video : “…तेव्हा अजित पवारांना खरा धक्का बसेल”, मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा; ‘गद्दार’ शब्दावरूनही टोला!
शंभूराज देसाईंचा अजित पवारांना इशारा!

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याचवेळी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असाही राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ घेत आज मंत्री शंभूराज देसाई यांनी खोचक शब्दांत टोला लगावला. तसेच, स्थानिक राजकारणावरून त्यांनी अजित पवारांना सूचक इशाराही दिला आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

“आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की..”

अजित पवार उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केल्याचं यावेळी शंभूराज देसाई म्हणाले आहेत. “कुणी कुणाला गद्दार म्हणावं? अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या दोन खात्यांचा मी राज्यमंत्री होतो. मी दादांचं काम जवळून पाहिलं आहे. पण अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा की हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोतठ, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीची अनेक मंडळी आमच्या संपर्कात”

दरम्यान, यावेळी बोलताना देसाई यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते-पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. “अजित पवार सत्तेतून बाहेर गेल्यामुळे त्यांचं हे सगळं सुरू आहे. सातारा जिल्ह्यातली राष्ट्रवादीची काही मंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आल्यानंतर आम्हाला गद्दार म्हणायचं, हे सरकार लवकरच पडणार अशी वक्व्य करून त्यांच्यासोबतची माणसं थांबवण्याचं काम अजित पवार करत आहेत. पण २०२४च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात दूध का दूध, पानी का पानी होईल”, असा निर्धार देसाई यांनी व्यक्त केला.

“सध्याचे नवे हिंदूहृदयसम्राट…”, दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पटोलेंचा शिंदे गटाला टोला!

“एकेकाळी सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आठपैकी सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. आज आठपैकी चार आमदार शिवसेना-भाजपाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस निम्म्यावर आली आहे आम्ही जास्त बोलणार नाही. त्यामुळे २०२४मध्ये यापेक्षा वेगळं चित्र अजित पवारांना पाहायला मिळेल. तेव्हा त्यांना खरा धक्का बसेल”, असा सूचक इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवारांनी शुक्रवारी साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे गटावर तोंडसुख घेतलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. कसले सर्वसामान्य? फोडाफोडी आणि गद्दारीचं राजकारण करून बाहेर पडणारं सर्वसामान्यांचं सरकार आहे. या सरकारमधले सर्वजण सुरत, गुवाहाटी, गोव्याला जातायत. साताऱ्यात मी अर्थमंत्री असताना विकासकामासाठी मोठा निधी दिला. आता शिंदे सरकारमधील शंभूराज देसाई आवाज उठवतील का?” असा सवाल अजित पवारांनी साताऱ्यात बोलताना उपस्थित केला होता.

शशिकांत शिंदेंना टोला

दरम्यान, शशिकांत शिंदेंनी’मला कुणी ५० कोटी दिले, तर मी पक्षवाढीसाठी काम करेन’ असं वक्तव्य केल्याबद्दल पत्रकारांनी विचारताच देसाई यांनी या विधानाचा समाचार घेतला.”त्यांना कुणी द्यायचे? त्यांचा पक्ष त्यांना वाढवायचा आहे. त्यांच्या पक्षानं हे ठरवायला हवं. त्यांनी असं दुसऱ्या कुणाला बोलण्यापेक्षा खोके घेऊनच पक्ष वाढवायचा असेल, तर त्यांच्या पक्षातच हा विषय मांडावा”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या