गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे ती दसरा मेळाव्याची. दरवर्षी ही चर्चा ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ अशी सुरू असते. यंदा मात्र ती चर्चा ‘नेमका कुणाचा दसरा मेळावा?’ अशा सुरू आहे. त्याला कारण ठरली ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी केलेली बंडखोरी. सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर शिंदे गटानं जसा मूळ शिवसेना आमचीच आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आमचाच अशी भूमिका मांडली, तसा आता दसरा मेळाव्यावरही शिंदे गटानं हक्क सांगितला असून त्यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे दोन तृतियांशहून जास्त लोकप्रतिनिधी शिंदे गटात असल्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे परिणामी शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील शिंदे गटाचा हक्क असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता मात्र शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यासोबतच शिवसेनेच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरच शिंदे गटानं हक्क सांगितला आहे. एवढंच नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचा दावाच शिंदे गटाकडून केला जात आहे.

आदित्य ठाकरेंनी केली होती टीका

दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी “दसरा मेळावा शिवसेनेचाच होता आणि शिवसेनेचाच राहील” अशी ठाम भूमिका मांडली होती. मात्र, अद्याप प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नसून हे गद्दार राजकारण करत असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली होती. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी एक मोठं विधान केलं आहे.

दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं; “अजून परवानगी मिळाली नाही पण शिवतीर्थावर..”, आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया!

“त्यांना दसरा मेळावा करण्याचा काय अधिकार?”

“जे कुणी या दसरा मेळाव्यावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडले आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणता अधिकार आहे तो मेळावा करण्याचा?” असा सवाल नरेश म्हस्केंनी शिवसेनेला विचारला आहे.

“कळेल तुम्हाला, मुख्यमंत्री निर्णय घेतील”

“दसरा मेळावा घ्यायचा अधिकार आमचा आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्यामुळे तो अधिकार आमचा आहे. कारण हा मेळावाच हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. कळेल तुम्हाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील”, असं सूचक विधान नरेश म्हस्के यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde group naresh mhaske on shivsena dussehra melava 2022 at shivaji park dadar pmw
First published on: 28-08-2022 at 17:28 IST