scorecardresearch

“मी इंदिरा गांधींचा फॅन होतो” म्हणत एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात जोरदार टोलेबाजी केली आहे.

“मी इंदिरा गांधींचा फॅन होतो” म्हणत एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर, सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बऱ्याच वेळा दिल्लीला गेले. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत कार्यालय सुरू केल्याची टीकाही काहींनी केली होती. या सर्व टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विधीमंडळात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचा आपण मोठा फॅन असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीला जाण्यावरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा डंका संपूर्ण जगात पिटवलेला आहे. मी इंदिरा गांधींचा फॅन होतो. त्यांनी चांगलं काम केलं, त्या डॅशिंग होत्या. आता नरेंद्र मोदीही अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात घेऊन आले, त्यांची दोस्ती किती चांगली आहे. ज्यो बायडेनला आलिंगन देत ते फिरत असतात. एवढं कधी तुम्ही बघितलं होतं का?” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

हेही वाचा- आधी मुख्यमंत्र्यांना ऑफर, मग पंतप्रधानपदाचा उल्लेख करत फडणवीसांना चिमटा, जयंत पाटलांची विधानसभेत टोलेबाजी!

पुढे ते म्हणाले, “अमेरिका महासत्ता असताना मोदींनी हे केलं आहे. आता आपला देशही महासत्ता बनणार आहे. तुम्हाला याचा काही त्रास आहे का? त्यामुळे अशा नेत्याला भेटायला जाण्यासाठी आपल्याला रान कशाला बघायचंय? आपल्याला काम बघायचं आहे.”

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा- “हा हनिमून आणखी किती दिवस…” सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर खोचक टीका!

“पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे की, महाराष्ट्रासाठी १०० दिवसांची योजना तयार करा. केंद्राकडून एक पैशाचीही कमी भासू देणार नाही. त्यामुळे आपल्याला तिकडे जायला नको का? आम्ही त्यावेळी खाते वाटपासाठी दिल्लीला गेलो नव्हतो. ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे ओबीसीला आरक्षण मिळालं. बाळासाहेबांचे काही स्वप्न होते, ते म्हणायचे एक दिवस मला पंतप्रधान बनवा, मी ३७० कलम हटवून दाखवतो. राम मंदिर बांधलं पाहिजे. पण नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधलं, त्यांनी ३७० कलमही हटवलं. याला कुणीही विरोध करू शकलं नाही. जे चांगलं काम करतात त्यांच्याकडे जाणं काही चुकीचं आहे का?” असा सवालही एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde praise on prime minister modi also said i was big fan of indira gandhi rmm

ताज्या बातम्या