५ मार्च रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली होती. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. या सभेला मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये सभा होणार आहे. आज संध्याकाळी ही सभा होत असून त्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ठिकाणही तेच, मैदानही तेच!

दरम्यान, उद्धव ठाकरेंची ५ मार्च रोजी खेडमधल्या ज्या गोळीबार मैदानावर सभा झाली होती, त्याच मैदानावर आज एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेविषयी दोन्ही बाजूंनी सातत्याने टीका-टिप्पणी आणि भूमिका मांडली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला जशी गर्दी झाली होती, तशीच गर्दी या सभेलाही होईल का? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होईल, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

“खेडमध्ये उद्धव ठाकरे ५ तारखेला आले होते. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या हातात काहीही नाही द्यायला. अडीच वर्षं त्यांच्या हातात मुख्यमंत्री असताना द्यायला पुष्कळ होतं. पण ते त्यांनी दिलं नाही. आज मुख्यमंत्री येत आहेत, त्यांनी माझ्या कोकणासाठी काहीतरी देऊन जावं”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.

“शिवसेनेचे वाईट दिवस जेव्हा होते, तेव्हा मातोश्रीच्या पाठिशी रामदास कदम खंबीरपणे उभा राहिला आहे. सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणारी आजची सभा असेल. कोकणात जितक्या सभा झाल्या, त्या सगळ्यांचा रेकॉर्ड ब्रेक करणारी ही ऐतिहासिक सभा असेल”, असंही रामदास कदम यांनी यासंदर्भात सांगितलं.

एकनाथ शिंदेंच्या सभेचा टीझर!

दरम्यान, १७ मार्च रोजी एकनाथ शिंदेंच्या खेडमधील सभेचा टीझर शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आला होता. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंची काही विधानं घेण्यात आली आहेत. त्याबरोबर एकनाथ शिंदेंचं “महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका घेतली” हे एका जाहीर सभेतलं विधानही घेण्यात आलं आहे.