स्वच्छ, प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणारा ट्रॅक्टर स्वत: चालवला आहे. यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई स्वच्छतेसाठी डीप क्लिन ड्राईव्ह योजना गरजेची आहे. ही माझी संकल्पना आहे. एकाच ठिकाणी चार-पाच वॉर्डचे लोक घ्यायचे. दोन-अडीच लोकांना घेऊन रस्ते स्वच्छ करायचे. फक्त रस्तेच नाही, गल्ल्या, नाले, सार्वजनिक स्वच्छतागृहे एकाच दिवशी स्वच्छ करायचे, अशी डीप क्लिन योजना आहे.
“मी चौपाटीवरही गेलो होतो. ते (आदित्य ठाकरे) माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. तो जो ट्रॅक्टर होता, त्यावर मागे क्लिनर आहे. तो पाठीमागून फिरतो. त्यात असलेले दगड, प्लास्टिक वेगळे केले जातात. फक्त रेती आणि वाळू मागे राहते. त्यांनी अर्धवट माहिती घेतली आहे”. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही रस्त्यांची सफाई करतो. समुद्राची सफाई करतो. त्यांनी हातची सफाई केली. तिजोरीची सफाई केली. आम्ही रस्ते धुतोय तेही त्यांना आवडत नाही. त्यांनी तिजोरी धुतली आणि आम्ही रस्ते धुतोय आता. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू
कांदा निर्यातीबाबत राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या पियुष गोयलांपर्यंत पोहोचवल्या आहेत. इथेनॉलसंदर्भातही अमित शाह, संबंधित मंत्रि महोदयांशी वेळ घेऊन भेट देऊ. केंद्राशी निगडीत असलेल्या राज्यातील प्रश्नांवर चर्चा करू. राज्यातील जनतेवर कोणताही अन्याय होणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
युद्धपातळीवर पंचनामे सुरू
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतांचे पंचनामे होत आहेत. काल-परवा नागपूर, विदर्भात पाऊस पडला. धनाचं नुकसान झालं आहे. युद्धपातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे एकत्रित आल्यानंतर नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
“पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचं काम अनेक कंपन्यांकडून सुरू आहे. यामध्ये असलेले अडथळे सरकार म्हणून दूर करू. शेतकऱ्यांना पीकविमा योजना रुपयात देण्याचा उद्देशच एवढा आहे की शेतकऱ्यांना कोणतीही तोशिष लागू नये”, असं शिंदे म्हणाले.
यावरून ठाकरेंचं गांभीर्य दिसतं
आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे विधानभवनात येणार आहेत. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, आमदार म्हणून त्यांना विधानभवनात यावंच लागेल. यावरून शेतकऱ्यांबद्दल, महाराष्ट्रबद्दल असलेलं गांभीर्य दिसून येतं.