scorecardresearch

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यावरुन महाराष्ट्रात कधी परतणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “सर्व आमदार…”

गोव्यामधून मुंबईसाठी रवाना होण्याच्या आधी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी ही माहिती दिली.

Shinde And MLA
गोव्यामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली माहिती

राज्यामध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रामध्ये येणार असल्याची घोषणा केलीय. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारुन सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले आणि सध्या गोव्यात असणारे आमदार कधी परत आहेत याबद्दलची माहिती दिली. गोव्यामधून मुंबईसाठी रवाना होण्याच्या आधी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी ही माहिती दिली.

नक्की वाचा >> फडणवीसांनी उपमुख्यंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “ही बढती आहे की अवनती…”

पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी तीन आणि चार जुलै रोजी अधिवेशन बोलवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच पुढे बोलताना त्यांनी आम्हाला बहुमताची चिंता नाहीय, आमच्याकडे १७० आमदार आहेत असा दावा केलाय. यावेळेस पत्रकारांनी शिंदेंना बंडखोर आमदार महाराष्ट्रात कधी परत येणार?, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना शिंदे यांनी, “सर्व आमदार उद्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत,” असं उत्तर दिलं. “तीन आणि चार तारखेला अधिवेशन बोलवलं असून तेव्हा सर्व काही प्रक्रिया पार पडेल. आमच्याकडे १७० आमदार असल्याने बहुमताचा प्रश्नच येत नाही,” असंही यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२”

मुख्यमंत्र्यांची धावती गोवा भेट
गुरुवारी सायंकाळी शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रीमंडळाची पहिली बैठक संपल्यावर शिंदे यांनी रात्री उशीरा थेट गोवा गाठत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मुख्यमंत्री म्हणून भेट घेतली. शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आणि अपक्ष आमदार गोव्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्रीनंतर पोहोचले. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> “BJP आणि RSS ला विचारलं पाहिजे, फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय का?”

मुंबईमधील पाऊस आणि कृषीदिननाबद्दलही केलं भाष्य…
मुंबईमध्ये कालपासून कोसळणाऱ्या पावसाबद्दलही शिंदेंनी चिंता व्यक्त केली. “मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून यासंदर्भातील निर्देश मुंबईच्या आयुक्तांना दिले आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीदिन सरकारमार्फत साजरा केला जाणार आहे, असंही शिंदेंनी सांगितलं. कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी संकटात येऊ नये म्हणून चांगले निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून या प्रश्नामधून मार्ग काढतोय, असं शिंदे म्हणाले. हमीभावासाठी सरकार कटिबद्ध असून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> “आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे…” शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार हे २२ जूनपासून गुवाहाटीमधील हॉटेल रियान्स ब्लूमध्ये वास्तव्यास होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर हे आमदार २९ आणि ३० जूनच्या रात्री गोव्यात दाखल झाले. मात्र २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ३० तारखेला शिंदे मुख्यमंत्री झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde says shivsena rebel mlas to return in state from goa on july 2nd scsg

ताज्या बातम्या