महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दावोस (स्वित्झर्लंड) दौऱ्यावर आहेत. आज (१६ जानेवारी) या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार यावेळी करण्यात आला. तसेच बी. सी. जिंदाल यांच्याबरोबर ४१ हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला.

ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शनबरोबर २५ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलीकेली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून त्यांना महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी जैन यांची चर्चा झाली.

जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या

देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बी. सी. जिंदाल यांच्याशी ४१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर देखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात ५००० नोकऱ्या निर्माण होतील.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्सबरोबर ४,००० कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प सुरू होईल. अशाप्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.

हे ही वाचा >> सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर? ठाकरेंच्या आरोपांनतर नार्वेकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे करार झाले तेव्हा महाराष्ट्राच्या दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता उपस्थित होते.