विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेशी गेली २५ वर्षे असलेली युती तोडल्याने भाजपला स्वत:ची ताकद समजली. आतापर्यंत कधीही मिळाले नव्हते, एवढे घवघवीत यश महाराष्ट्रात भाजपला मिळाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकार स्थिर असल्याची ग्वाही दिली. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे टिकेल आणि त्यानंतरही जनता आम्हाला निवडून देईल, असा विश्वास फडणवीस यांनी शनिवारी राज्य परिषदेत व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले, शिवसेनेशी असलेली युती तुटेल, असे वाटले नव्हते. केवळ तीन दिवसांत सर्व जागा लढविण्यासाठी तयारी करावी लागली. त्यात १२३ जागा भाजपला स्वबळावर मिळाल्या. ज्याप्रमाणे हनुमानाला आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यात आल्यावर त्याने उडी घेऊन लंकेवर धडक मारली, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी आत्मविश्वास दिल्याने आम्ही युती तोडून लढलो. त्यानिमित्ताने आम्हाला आमच्या ताकदीची जाणीव झाली.
औरंगाबाद, नवी मुंबई यांसह अन्य निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. प्रशासन पारदर्शी व गतिमान राहील, याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. राज्यातील सरकार कोसळेल, अशी शक्यता काहींना वाटत आहे. पण सरकार मजबूत आहे. ते पाच वर्षे टिकेल, सरकारला कोणताही धोका नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भूमीअधिग्रहणासाठी थेट खरेदीने शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्याचे ‘मॉडेल’ आम्ही दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ग्रामीण भागात जमिनीचा पाचपट मोबदला मिळणार आहे, असे सांगून रक्ताच्या नातेवाईकांना स्थावर मालमत्ता हस्तांतरित करताना मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm fadnavis on shiv sena bjp alliance
First published on: 24-05-2015 at 04:51 IST