भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे होते. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. त्यांच्या आक्रोशाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ‘आऊटबॉर्न’ आणि ‘इनबॉर्न’ असे दोन कक्ष आहेत. सर्व मृत बालके ‘आऊटबॉर्न’मधील आहेत. त्यातील दोघांचा होरपळून, तर आठ बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
नेमकं काय घडलं?

पहाटे दोनच्या सुमारास आग लागली तेव्हा बालकांच्या अतिदक्षता कक्षात दोन परिचारिका होत्या. परंतु त्या गाढ झोपेत होत्या. आग भडकल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करत कक्षाबाहेर धाव घेतली. आगीचे लोळ आणि धूर पाहून रुग्णालयाबाहेरील नागरिकही मदतीला धावले. परंतू तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते. दहा कोवळे जीव होरपळून आणि गुदमरून गतप्राण झाले होते. काही बालके पूर्णपणे होरपळली होती. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray arrives at bhandara district general hospital where a fire broke out on january 9 aau
First published on: 10-01-2021 at 14:33 IST