scorecardresearch

“…तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपावाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते”; मुख्यमंत्र्यांचा टोला

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समितीतून सर्वात प्रथम जनसंघवाले फुटले,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

nawab malik anil deshmukh
मुख्यमंत्र्यांनी साधला निशाणा (मुख्यमंत्र्यांचा फोटो अमित चक्रवर्तींच्या सौजन्याने)

शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास दया माया न दाखवता पळता भुई थोडी करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना दिला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र बसू आणि लोकांच्या हिताची कामे करू, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका करताना अनेक प्रकरणांचा संदर्भ दिला. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचाही उल्लेख केला.

हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले?
भाजपाकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वासंदर्भात होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामधील फरक सांगितला. भाजपाच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. भाजपाचे हिंदुत्व विकृत असून ते आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार दिला. पण भाजपा हिंदुत्वाचा विखार पसरवत आहे. या हिंदुत्त्वातून देशाला दिशा काय देणार? त्यातून देशाची दुर्दशा होत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले, याचे दाखले समोर ठेवा, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले.

संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा संपला तर हिंदुत्व…
भाजपाचे हिंदुत्ववादी खालच्या पातळीची, विखारी भाषा करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ विचार त्यांनी व्यक्त केले. हेच का भाजपाचे, संघाचे, भाजपाप्रणित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार, असा सवाल ठाकरे यांनी केला. संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा संपला तर हिंदुत्व कसले, असेही त्यांनी सुनावले.

भाजपाचे हे हिंदुत्त्व म्हणजे…
महागाई, बेरोजगारी आणि काश्मीरमधील दहशतवादावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. काश्मीरमध्ये राहुल भटला जिथे मारले तिथे काय हनुमान चालिसा म्हणायची? हे काश्मार फाईलचे पुढचे पाऊल आहे काय? असा सवाल त्यांनी केला. भाजपाचे हे हिंदुत्त्व म्हणजे भ्रमिष्ट करण्याचे हिंदुत्त्व असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

…तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे…
“देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समितीतून सर्वात प्रथम जनसंघवाले फुटले. शिवसेनेची पंचवीस वर्षे युतीमध्ये सडली. त्यानंतर यांचा हिंदुत्वाचा बुरखा फाटला आणि यांचा भेसूर चेहरा सर्वाना दिसला. आम्ही काँग्रेससोबत जाऊनही हातातला भगवा सोडला नाही. आम्ही जे केले ते उघडपणे केले. पण तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपावाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray slams bjp over nawab malik anil deshmukh issue scsg

ताज्या बातम्या