हवामानाचे चक्र गेल्या दहा-बारा वर्षांंत बदलले असून, ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू होणारी थंडी आता डिसेंबरच्या मध्यानंतर सुरु व्हायला लागली आहे. अमेरिका, तसेच उत्तर ध्रृवावरील हिमवादळांच्या परिणामामुळे यंदा २० डिसेंबरनंतरच भारतात खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल, असे संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले आहेत.
जागतिक पातळीवरील तापमानातील बदलाचा परिणाम सर्वत्र होत आहे.  पन्नास वर्षांपासूनच्या नोंदी तपासल्या, तर आतापर्यंत ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चक्र पूर्णपणे बदलले आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात थंडीला सुरुवात होऊन जानेवारीपर्यंत ती कायम राहते. गेल्या वर्षीसुद्धा उशिरा थंडीला सुरुवात होऊन फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत ती कायम होती. अमेरिकेची हीम वादळे हिमालयाकडून चीनकडे येऊ लागली की, तापमानात कमालीची घट व्हायला सुरुवात होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे हे वारे वाहतात आणि थंडीचा जोरही वाढतो. राजस्थान, पंजाब, हरियाना या प्रदेशांत तापमान १ ते २ अंशापर्यंत उतरते. विदर्भात ते ६, ७ आणि महाबळेश्वरला ते १ अंशापर्यंत जाते. २०१० पासून हिमवादळाचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये कोरडय़ा हवामानाचे संकेत शुक्रवारी दिले.
उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशमध्ये विदर्भ, पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या तुलनेत तापमान सामान्यापेक्षा जास्त होते. पश्चिम विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये तापमान सामान्यापेक्षा कमी, उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशात तापमान सामान्यापेक्षा जास्त आणि संपूर्ण विभागात सामान्य होते. अकोला येथे सर्वाधिक ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मध्य प्रदेशातील मंडला येथे सर्वाधिक कमी म्हणजे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.