नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याला रविवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी गारांच्या पावसाने जोरदार तडाखा दिला असून उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हाती आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांचे अब्जावधी रूपयांचे नुकसान झाले असून अस्मानी संकटाने शेतकरी पार कोलमडून गेले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास संपूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी एक ते दीड इंच बर्फाचे थर साठले होते. शुक्रवारी व शनिवारी पूर्व व पश्चिम भागात गारांचा पाऊस झाला होता. रविवारी संपूर्ण तालुक्यास गारांच्या पावसाने झोडपून काढले. संवत्सर,दशरथवाडी, ब्राह्मणगाव, टाकळी, संजीवनी, शिंगणापूर, नवसारी, रामवाडी, उक्कडगाव, कानेगाव, वारी, शिंगवे, कासळी, शिरसगाव, सडे येथे पावसामुळे मोठे नुकसान झाले. दशरथवाडी येथे एक झाड कोसळून त्याच्या खाली सापडून एक म्हैस ठार झाली. राज्य शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
ऊस, चिक्कू, डाळिंब, मका ही पिके या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने भुईसपाट झाली. शेतक ऱ्यांचे या पावसाने अतोनात नुकसान झाले असून उभी पिके होत्याची नव्हती झाली. तालुक्याच्या पश्चिम भागात चार मार्च रोजी जोरदार गारांचा पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. पश्चिम भागातील चासनळी, वडगाव, बक्तरपूर, हंडेवाडी, मंजूर, कारवाडी, सुरेगाव, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, कोळगावथडी, वेळापूर, मळेगावथडी, रवंदा, धामोरी, मुर्शतपूर, जेऊरपाटोदा येथे ४ मार्च रोजी झालेल्या गारपिटीने कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यात अशी अस्मानी संकटे नेहमी येतात परंतु यंदाचा असा गारांचा पाऊस अनुभवला नव्हता असे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसामुळे किमान तोन-तीन वर्षे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडू शकणार नाही, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
कोपरगाव तालुक्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी गारांचा तडाखा
नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याला रविवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी गारांच्या पावसाने जोरदार तडाखा दिला असून उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हाती आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांचे अब्जावधी रूपयांचे नुकसान झाले असून अस्मानी संकटाने शेतकरी पार कोलमडून गेले आहेत.
First published on: 10-03-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold and rain in koprgao