महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने खान अकॅडमी इंडियासोबत महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित मराठीमध्ये शिकवण्यासाठी भागीदारी केली आहे. विद्यार्थ्यांचे निकाल सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आता एक लाख विद्यार्थ्यांना ऑनलाइन गणित मराठीत शिकवण्यात येणार आहे.
खान अकॅडमीतर्फे महाराष्ट्र सरकारसोबत २,००० शिक्षक, ३६ जिल्हा नोडल अधिकारी आणि ४८८ मुख्याध्यापकांना शिक्षित करण्यासाठी काम करत आहे. भागीदारीचा पहिला टप्पा महाराष्ट्रातील १,००,००० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी ४८८ शाळांमध्ये ऑनलाईन गणित शिकण्याचे वातावरण यशस्वीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. हे अधिक शाळा आणि स्वतंत्र शिकवणाऱ्यांपर्यंत विस्तारित केले जाईल, ज्याचा विद्यार्थ्याना लाभ घेता येणार आहे.
महाराष्ट्र सरकार आणि खान अकॅडमी इंडिया २०२१ पासून मराठीत ७०० हून अधिक व्हिडिओ, लेख आणि सराव परीक्षा असलेली दर्जेदार गणित विषयाची सामग्री पुन्हा तयार करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. हे सर्व खान अकॅडमी व्यतिरिक्त राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर उपलब्ध असतील. हे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत: च्या गतीने, कोणत्याही डिव्हाइसवर आणि विनामूल्य गणिताचे ठोस पायाभूत आकलन तयार करण्यात मदत करेल.
“समाज आणि देशाचे भविष्य असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आणि सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. खान अकॅडमी सारख्या संस्था राज्य सरकारसोबत चांगल्या शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या समान दृष्टीकोनातून काम करत आहेत याचा मला आनंद आहे,” असे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
ही भागीदारी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत शिकण्यास मदत करण्यासाठी मराठीतील दर्जेदार गणित शिक्षण सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल. याव्यतिरिक्त, सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण संसाधनांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. शिक्षकांना शिक्षणातील अंतर ओळखण्यासाठी आवश्यक ऑनलाइन साधने आणि रीअल-टाइम डेटामध्ये प्रवेश असणार आहे.