सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आणि प्रशासनातील समन्वयासह निर्णयक्षमतेचा अभाव व त्यातून रखडलेली विकासकामे या मुद्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषदेच्या कारभारावर जोरदार टीका करून पदाधिका-यांना ‘घरचा आहेर’ दिला. स्वकीयांसह मित्रपक्षाच्या सदस्यांनीही हल्ला चढविल्यामुळे पदाधिकारी चांगलेच धास्तावले होते.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला काँग्रेसचे उमाकांत राठोड यांनी सभेच्या विषयपत्रिकेत दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजलीचा विषय दाखल करून घेतला नसल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. जि.प. अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी यांनी गेल्या महिन्यात इतर पदाधिका-यांकडून हेटाळणी होत असल्याबद्दल निराश होऊन पदाचा राजीनामा पश्रक्षेष्ठींकडे सादर केला होता. त्याचा संदर्भ देत महिला अध्यक्षांचा योग्य सन्मान न राखता त्यांची हेटाळणी करणारे कोण, असा सवाल राठोड यांनी उपस्थित करीत सत्ताधा-यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अध्यक्ष डॉ. माळी यांची भंबेरी उडाली खरी, परंतु त्यांनी लगेचच स्वत:ला सावरत, माझ्या ‘त्या’ विधानाचा आणि सर्वसाधारण सभेचा संबंध नसल्याचा खुलासा केला आणि वेळ मारून नेली.
सांगोल्याच्या राणी दिघे यांनी शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षणाची हेळसांड व शैक्षणिक गुणवत्तेचा अभाव यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवर पालक नाराज असून गावात पालक शाळांना कुलूप ठोकत असल्याचे राणी दिघे यांनी निदर्शनास आणून दिले. तर या विषयावरील चर्चेत सहभागी होताना अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी, अखचिर्त बायोमॅट्रिक्स यंत्रणा, शाळांना संगणक न पुरविलेल्या मक्तेदारांवर न झालेली कारवाई यांचा हवाला देत शिक्षण विभाग निष्क्रिय ठरल्याचा शेरा मारला. विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्हा परिषद सभागृहात धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या अनेक गंभीर विषयावरील चर्चेकडे दुर्लक्ष करणारे जि. प. उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आजच्या सभेत मात्र त्यांच्या आक्षेपाचे समर्थन केले. त्यामुळे शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील हे गांगरून गेले.
दक्षिण सोलापूरचे सुरेश हसापुरे यांनीही सत्ताधा-यांवर तोंडसुख घेताना, मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याची तक्रार उपस्थित केली. मुलींसाठी वसतिगृह उभारता येत नसेल तर पदाधिका-यांनी स्वत:ची निवासस्थाने वसतिगृहासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढविला. तर मागासवर्गीय कक्ष न उभारता मागासवर्गीयांना हक्कांपासून वंचित ठेवण्यात आल्याबद्दल अभिजित ढोबळे यांनीही नाराजी व्यक्त केली. गारपीटग्रस्त शेतक-यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसल्याची तक्रारही सभेत करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कारभारावर कोणाचेही समाधान झाले नसल्याची टीका सत्ताधारी सदस्यांनी केल्यामुळे पदाधिकारी पेचात सापडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comment of zp management by ncp members
First published on: 02-07-2014 at 03:33 IST