अहिल्यानगर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका शहरात ५०० सदनिकांचा घरकुल प्रकल्प राबवणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. या घरकुल योजनेसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच, वैयक्तिक जागेवर घरकुल बांधण्यासाठी २०० अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील ५५ घरकुलांचा प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठवल्याची माहितीही त्यांनी दिली.
शहरातील काटवन खंडोबा परिसरात महापालिकेच्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एका सदनिकेची किंमत सुमारे १५ लाख रुपये इतकी असून, ३०० चौरस फुटांची सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, संकुलाच्या आवारात कम्युनिटी हॉलसह इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत. या घरकुलांसाठी मनपाकडे ७६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याची छाननी सुरू आहे. घरकुलाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर किमान १ लाख रुपये भरून नोंदणी करून घेतली जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे हक्काचे घर मिळणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.
तसेच, वैयक्तिक जागेवर घरकुल बांधण्यासाठीही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे २.५ लाख रुपयांचे अनुदान तीन टप्प्यांत दिले जाते. त्यासाठी २०० अर्ज दाखल झाले आहेत. ५५ घरकुलांचा प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थ्याला मिळणार आहे.घरकुल योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी मनपाकडून कार्यशाळा घेतल्या जात आहेत. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी मनपाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.