कर्जत : शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठित करण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. कर्जमाफी योग्यवेळी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, शुक्रवारी श्रीगोंदा येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना सांगितले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, माजी आमदार लहू कानडे व चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, घनश्याम शेलार, बाळासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे, भगवान पाचपुते, सचिन जगताप, संध्या सोनवणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने जी घोषणा जाहीरनाम्यात केली होती, त्यावर आम्ही ठाम आहोत. यासाठी समिती तयार करण्यात आली आहे, योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. महाराष्ट्राचे सामाजिक व सांस्कृतिक वैभव टिकवण्यासाठी आज एकीची गरज आहे. जातीय तेढ निर्माण झाली तर त्यामुळे विकासाला खीळ बसते. सध्या लाडकी बहीण व शेतकऱ्यांच्या विविध योजनांमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. मात्र, यावरही लवकरच मार्ग निघेल.
सध्या खासगी व सहकारी कारखान्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. अनेक कारखान्यांना आर्थिक मदत हवी आहे. मात्र, यापुढील काळामध्ये कारखाना कोणताही असो, संचालक मंडळांना तारण ठेवूनच सरकार त्यांना मदत करेल. श्रीगोंद्यासाठी कुकडी-घोड प्रकल्प, डिंबे-माणिकडोह आणि साकळाई पाणीयोजनांमधील अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही आश्वासन पवार यांनी दिले.
यावेळी राजेंद्र नागवडे, राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांचीही भाषणे झाली.
हलक्या कानाचे राहू नका
श्रीगोंद्यातील आगामी निवडणुकीसाठी आपसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून प्रामाणिकपणे निवडणूक लढा. हलक्या कानाचे राहू नका. निश्चित यश मिळेल. विधानसभा निवडणुकीवेळी तिघेजण एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, यामुळे कमी मते पडून पाचपुते आमदार झाले हे लक्षात घ्या, असा टोला अजित पवार यांनी अनेकांना लगावला.
संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा प्रयत्न
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे व उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी अजित पवार यांचे भाषण सुरू असताना कांद्याच्या व दुधाच्या प्रश्नावर बोलावे, अशी मागणी केली. ब्रिगेडचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा आणल्या होत्या. त्यांनी त्या अजित पवार यांना दाखवत कांद्याच्या प्रश्नावर व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावे, अशी मागणी केली. नंतर त्यांनी या माळा पवार यांच्या दिशेने भिरकावण्याचाही प्रयत्न केला. परंतु, उपस्थित पोलिसांनी त्यांना अटकाव केला.