लोकसत्ता प्रतिनिधी

अहिल्यानगर : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने आयोजित केलेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबी लढतीसाठी पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली. या लढतीत मोहोळला विजयी ठरवले गेल्यानंतर, पंचांच्या निर्णयाविरोधात मोठा वाद निर्माण झाला. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही कुस्ती मोहोळ यांनी जिंकल्याचा आरोप कुस्ती क्षेत्रात होत आहे. याबाबत शिवराज राक्षे यांनी अद्याप कुस्तीगीर संघाकडे कोणतीही तक्रार किंवा चौकशीसाठी अर्ज दिलेला नाही. पंचांच्या निर्णयावर आरोप व नाराजी व्यक्त होत असल्याने राज्य संघाने किताबी लढतीची सखोल चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक केली आहे.

या समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा. विलास कथुरे यांची नितुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर चार तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून २८ फेब्रुवारीपर्यंत राज्य संघाकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती संघाचे सचिव तथा हिंद केसरी योगेश दोडके यांनी दिली.

याबाबत योगेश दोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले की, अहिल्यानगरमध्ये दि. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागाची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात झाली होती. या कुस्तीस पंच म्हणुन छत्रपती संभाजीनगर येथील आंतराष्ट्रीय पंच नितीश काबीलिये, मॅट अध्यक्ष म्हणुन शासकीय कोच दत्तात्रय माने व साईड पंच म्हणुन विवेक नाईकलब यांची नेमणुक करण्यात आली होती. किताबी कुस्तीच्या निकालावरून बराच गदरोळ निर्माण झाला. स्पर्धा संपल्यानंतर जनमानसातही निकालावरून नाराजी व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निकालाविरूध्द शिवराज राक्षे याने आजपर्यंत कोणतीच लेखी हरकत राज्य संघाकडे नोंदवली नाही. परंतु समाजात निकालाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चेचा विचार करून राज्य संघाने याबाबत ५ जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशी समितीच्या प्रमुखपदी प्रा. विलास कथुरे, सदस्य म्हणून प्रा. दिनेश गुंड (पुणे), सुनिल देशमुख (जळगाव), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू नामदेव बडरे (सांगली) व राष्ट्रीय खेळाडू विशाल बलकवडे (नाशिक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील पंचांच्या निर्णयाची सखोल करून २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल राज्ज संघाकडे सादर करणार आहे.