माओवादी जनआंदोलनाला बदनाम करीत असल्याचा चौघांविरुद्ध ठपका
माओवादी जनआंदोलनाला बदनाम करीत असल्याचा ठपका ठेवून ‘भारत की कम्युनिनस्ट पार्टी’ (माओवादी) दक्षिण सब झोनल ब्युरोच्या सचिवाने बस्तरच्या केंद्रीय लोकन्यायालयात नऊ दिवस खटला चालवला. यामध्ये दोषी आढळलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘लीगल राईट्स ऑबजर्वेटरीचे कन्वीनर, महासचिव, सचिव व प्रवक्ता अशा चौघांविरुध्द ‘डेथ वॉरन्ट’ काढून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या चारही जणांना लोकन्यायालयात ३१ मे रोजी हजर राहण्यासंदर्भात समन्स पाठविण्यात आले असून ते गैरहजर राहिल्यास त्याच दिवशी रात्री बारा वाजता या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) दक्षिण सब झोनल ब्युरोचा सचिव गणेश उईके याच्या स्वाक्षरीने ८ मे २०१७ रोजी येथे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात क्रांतीकारी अभिवादनासह म्हटले आहे की, लगतच्या छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे भांडवलवाद्यांच्या हितांचे रक्षण आणि लोकांवर अत्याचार करण्यामध्ये सहभागी असलेल्या २५ शत्रू सैनिकांना आम्ही मारल्यानंतर भांडवलवाद्यांच्या तत्त्वांचे संरक्षण करण्यात अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एजंटांनी मीडिया आणि सोशल मीडियावर जनआंदोलनाला बदनाम करण्याची मोहीम चालविली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयात कडक सुरक्षेच्या गराडय़ात बसून ‘लीगल राईट्स ऑबजर्वेटरी’च्या नावावर हे एजंट सर्वसामान्य आदिवासी व गरिबांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या कॉमरेड नंदिनी सुन्दर, कॉमरेड कविता कृष्णन व कॉमरेड बेला भाटिया तसेच माओवादी जनआंदोलनाला बदनाम करीत आहेत.
या प्रकारच्या सर्व तत्त्वांच्या विरोधात बस्तरच्या केंद्रीय लोकन्यायालयात ९ दिवस खटला चालविण्यात आला. या खटल्यात दोषी आढळून आलेल्या लीगल राइट्स आबजर्वेटरीचे कन्वीनर, महासचिव तथा सचिव व प्रवक्ता या चार जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लोकन्यायालयात या सर्वाना ३१ मे २०१७ पर्यंत प्रत्यक्ष हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले आहे. मात्र, यानंतरही हे चारजण लोकन्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांना ठोठावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी ३१ मे २०१७ च्या रात्री १२ नंतर तात्काळ केली जाणार आहे.
उईके याच्या स्वाक्षरीने निघालेल्या या ‘डेथ वॉरंट’ने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या ‘डेथ वॉरन्ट’ची पत्रके सर्वत्र वितरित करण्यात आलेली आहे.