प्रल्हाद बोरसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगाव शहराध्यक्षपद रिक्त आहे. या पदासाठी सहा जणांमध्ये चढाओढ सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एमआयएमचा झेंडा हातात घेतला. विधानसभेत एमआयएमकडून लढताना काँग्रेसच्या शेख यांना पराभूत केले. त्याआधी मौलानांच्या नेतृत्वाखाली मालेगाव महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले यश मिळवले होते. ८४ पैकी २० जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागा मिळवणाऱ्या जनता दलाला सोबत घेत २७ सदस्यांची महाआघाडी स्थापन केली. अर्थात या संख्याबळावर महापालिकेत सत्तास्थापनेचे मनसुबे पूर्ण होऊ  शकले नाही.  महापालिकेतील विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांच्या नेतृत्वाखालील चौघांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित महागठबंधन आघाडीतील अन्य सदस्य एमआयएम आमदार मौलानांच्या वळचणीला राहिल्याचे दिसून आले.

पक्षनिरीक्षकांच्या अहवालावर निवड

या पदासाठी अतिक कमाल, युसूफ इलियास आणि एजाज बेग या तिघा नगरसेवकांसह सलीम रिजवी, युसूफ हाजी आणि रिजवान बॅटरीवाला हे सहा जण इच्छुक आहेत. पक्षाने निरीक्षक अविनाश आदिक यांना इच्छुक आणि अन्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी नुकतेच मालेगावात धाडले होते. पक्ष निरीक्षकांच्या अहवालानुसार  ही नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी पक्षाचे नाशिक जिल्ह्य़ाचे सर्वेसर्वा पालकमंत्री छगन भुजबळ यांची भूमिकादेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

इच्छुकांपैकी युसूफ इलियास आणि एजाज बेग हे दोघे आमदार मौलाना यांचे खंदे समर्थक मानले जातात. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएमबरोबरच आपल्या समर्थकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अप्रत्यक्षरीत्या ताब्यात ठेवण्याचा मौलानांचा प्रयत्न असल्याचा आक्षेप या संदर्भात घेतला जात आहे. सलीम रिझवी हे अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष आहेत.  युसूफ हाजी हे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

अतिक कमाल हे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. २९ वर्षे विधानसभेत मालेगावचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत समाजवादी नेते निहाल अहमद यांचे ते पुतणे आहेत.  रिजवान बॅटरीवाला हे आणखी एक इच्छुक नाव. स्थानिक पातळीवर आवामी पार्टी नावाचा त्यांचा एक पक्ष आहे. शहराध्यक्षपद मिळाल्यास आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन करू, असा त्यांचा प्रस्ताव आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition in malegaon for the post of ncp city president abn
First published on: 16-09-2020 at 00:11 IST