अहिल्यानगर: ग्रामविकास विभागाच्या विकासकामांच्या मंजुरीचे बनावट आदेश देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाची फसवणूक केल्याचा आणखी एक स्वतंत्र गुन्हा आज, गुरुवारी भिंगार कॅम्प पोलिसांनी दाखल केला. आता सार्वजनिक बांधकामामधील विद्युत उपविभागाची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. दरम्यान काल, बुधवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार देण्यास चार महिने विलंब का केला याचे स्पष्टीकरण मागणारे पत्र आज पाठवले आहे.
सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाच्या कनिष्ठ अभियंता सुप्रिया गोरखनाथ कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कनिष्ठ अभियंता सुप्रिया कांबळे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले की, १० डिसेंबर २०२४ रोजी आपण कार्यालयीन कामकाज करत असताना तेथे एक अनोळखी व्यक्ती आली व तिने ग्रामविकास विभागाचा ३ ऑक्टोबर २०२४ अन्वये आदेशाची झेरॉक्स प्रत सादर करून नगर, पारनेर तालुका व नगर शहरातील कामाची अंदाजपत्रके तयार करण्याची मागणी केली. त्यानुसार अंदाजपत्रके तयार करून उपविभागीय कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता घेऊन कार्यकारी अभियंत्यांमार्फत (विद्युत, नाशिक) कार्यारंभ आदेश देण्यात आले.
एकूण कामे सात असून त्यापैकी एका कामाचा खर्च ९.९० लाख रुपये आहे. त्यानंतर देयकांची छाननी करून निधी मागणीसाठी देयके ‘एलपीआरएस’ प्रणालीवर ऑनलाइनने ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आली. परंतु ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचा हा आदेश बनावट असून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांचे पत्र ४ एप्रिल २०२५ रोजी प्राप्त झाले. त्यानुसार कार्यकारी अभियंता (विद्युत, नाशिक) यांनी उर्वरित कामांना स्थगिती आदेश दिले. या विभागाने कोणतीही देयके अदा केलेली नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला ८ जुलै २०२५ रोजी कायदेशीर कारवाई करण्यास कळवले, त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलानी करत आहेत.
दरम्यान काल कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात ४ महिने विलंबाने फिर्याद दिल्याचे स्पष्टीकरण तपासी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून मागितले आहे.
आवश्यक कागदपत्रांची मागणी
आरोपी अक्षय चिर्के याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. विलंबाने फिर्याद दिली गेल्यामुळे आरोपीला पसार होण्यास संधी उपलब्ध झाली. परंतु तरीही पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने फिर्याद दिली असली तरी आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्याचीही मागणी विभागाकडे करण्यात आली आहे.-पोलीस निरीक्षक,प्रताप दराडे