लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली: सांगली जिल्ह्यातील विटा पोलिस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांनी फिर्यादीशी संगनमत करुन दीड किलो सोने हडप केल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांच्याकडे करण्यात आली आहे. यामुळे सांगली जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील संशयित सागर जगदाळे याने अधिक्षक बसवराज तेली यांना लेखी निवेदन दिले आहे. जगदाळे याच्या तक्रारीनुसार दि.१६ फेब्रुवारी रोजी विटा पोलिस ठाण्यामध्ये सूरज मकबुल मुल्ला याने खोटी तक्रार दिली होती. त्याने आपल्या दुकानात कामास असणाऱ्या सागर लहू मंडले यास कोलकत्ता येथे घेऊन जाण्यासाठी विटा येथे १०० ग्रॅम सोने दिले होते. तसेच शंकर जाधव यांचेही ४५५ ग्राम सोने त्याच्याकडे होते. मात्र तो कोलकात्यास पोहोचलाच नाही. यामुळे त्याने या सोन्याची चोरी केल्याचे म्हटले होते.
तपासादरम्यान विटा पोलिसांनी सागर मंडले याचा मित्र सागर जगदाळे याला ताब्यात घेत सागर मंडले सोने घेऊन फरार असल्याचे सांगितले. यावेळी सागर जगदाळे याने सागर मंडले याने आपल्याकडे दोन किलो सोने दिल्याचे सांगितले. यापैकी ४५५ ग्रॅम सोने विकले असुन राहिलेले १ हजार ५४५ ग्रॅम सोने आपल्या बहिणीकडे ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी हे सोने ताब्यात घेतले. सागर जगदाळे यास चार दिवस पोलीस ठाण्यात ठेऊन अत्याचार केला. या प्रकरणातील मूळ फिर्यादीमध्ये केवळ १०० ग्रॅम सोने चोरीची तक्रार होती. तपासात दोन किलो सोने हस्तगत केले असताना पोलिसांनी केवळ ४५५ ग्रॅम सोने रेकॉर्डवर घेतले. उर्वरीत १ हजार ५४५ ग्रॅम सोने पोलिसांनी हडप केल्याचा आरोप सागर जगदाळे याने केला आहे.
याबाबतचे पुरावेही त्याने पोलीस अधीक्षकांकडे सादर केले असून विटा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची यांची चौकशी व्हावी, त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.