जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे गट आणि भाजप-शिवसेना युतीत झालेल्या आघाडीचे दोघांनी समर्थन केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पक्षीय राजकारण केले जात नाही. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्याचा फायदा सहकार क्षेत्रालाही मिळावा, यासाठीच आम्ही बँकेची निवडणूक एकत्र लढवित आहोत, असे पालकमंत्री राम शिंदे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक निवडणुकीचा ‘अजेंडा’ वेगळा असतो, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विखे-भाजपमध्ये अखेर युती!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील थोरात गट यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते विखे यांनी भाजप-शिवसेना युतीशी एकत्रित मोट बांधली आहे. या संयुक्त आघाडीचा मेळावा , रविवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे व शिंदे यांनी या युतीचे समर्थन केले. नगरच्या दौऱ्यावर आलेल्या संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनीही मेळाव्यानंतर खा. दिलीप गांधी यांच्या समवेत सरकारी विश्रामगृहावर विखे यांची बंद खोलीत भेट घेऊन चर्चा केली. बँकेची निवडणूक मंगळवारी होत आहे.

सहकार क्षेत्रात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही भाजपच्या मदतीची गरज का भासली असा प्रश्न विखे यांना केला असता ते म्हणाले, काँग्रेसचे वर्चस्व आहे, असे मला वाटत नाही. जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण केले जात नाही. शेतकरी हितासाठी बँकेत नवीन विचार आला पाहिजे. काही जणांना सहकार ही आपली मक्तेदारी वाटत होती, ते त्याला पक्षीय झालर देण्याचा प्रयत्न करत होते, त्याला हे आमचे उत्तर आहे.

विरंगुळ्याची चर्चा
विधिमंडळात आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील काँग्रेसची धार बोथट होणार का, या प्रश्नावर बोलताना विखे म्हणाले की, त्याचा येथे काही संबंध नाही. सरकार चुकत असेल तर मी आवाज उठवणारच. ही भाजप प्रवेशाकडील वाटचाल समजायची का, या प्रश्नावर त्यांनी, ही काहींच्या विरंगुळ्याची चर्चा आहे, असे उत्तर दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress bjp shiv sena alliance in ahmednagar district bank election
First published on: 04-05-2015 at 03:12 IST