सर्व उपकारप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाकरिता जादा चटईक्षेत्र निर्देशांक, झोपडीत वास्तव्य असलेल्यांना पुनर्विकासात सदनिका, म्हाडाच्या इमारतींचा विकास असे मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेऊनही त्याचा राजकीय लाभ उठविण्याकरिता काँग्रेसकडून काहीच प्रयत्न केले जात नसल्याबद्दल स्वत: मुख्यमंत्री फारसे समाधानी नसल्याचे सांगण्यात येते.
आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी मुंबई महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा मनसे शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याची शक्यता असल्याने मुंबईत काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. त्यातच नरेंद्र मोदी यांच्यामुळे शहरी भागात कितपत फटका बसतो याचा अंदाज अद्याप येत नाही. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील व्होट बँकेला धक्का बसू नये म्हणून काँग्रेसचा प्रयत्न आहे.
 याचाच भाग म्हणून झोपडय़ांमध्ये राहणाऱ्याला पुनर्विकासात सदनिका मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या झोपडी नावावर नसल्यास पुनर्विकासात सदनिका मिळत नव्हती. याचा लाखो झोपडपट्टीवासियांना लाभ होणार आहे. झोपडपट्टीवासियांची मोठय़ा प्रमाणावर मते काँग्रेसला मिळतात.
मुंबई शहरातील उपकारप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीनपर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध करून देण्याचा निर्णयही रहिवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ‘म्हाडा’च्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी काही महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांकडील गृहनिर्माण खात्याने घेतले. हे सारे निर्णय होऊनही त्याचा राजकीय लाभ किंवा श्रेय घेण्यात मुंबई काँग्रेस कमी पडल्याची पक्षात भावना झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष निर्णय होण्यापूर्वीच त्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मोहीमच  हाती घेतली होती. आताही अन्न सुरक्षा कायद्याचे श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र मतदारांच्या हिताचे निर्णय होऊनही त्याचा मुंबईत फलकही लागलेला नाही. सरकार महत्त्वाचे निर्णय घेते पण पक्षसंघटना त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढाकार घेत नाही याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांजवळ नापसंतीची  व्यक्त केल्याचे समजते.