अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे गटनेते आ.सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली.

याबाबत विधानपरिषदेत बोलताना आ.पाटील यांनी सांगितले की, कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जवळपास १५ हजार हेक्टरवरील नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात अजून वाढ होऊ शकते. नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत, असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे. याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करून लेखी आदेश दिले नसल्यास त्वरित द्यावेत ,असेही आ.पाटील यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले, ३३ टक्क्यांच्या खाली नुकसान झाले असल्यास शासनाच्या आदेशानुसार नुकसान भरपाई मिळत नाही. या नियमात शिथिलता आणण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच एका हंगामात एकदाच नुकसान भरपाई देण्याचा नियम शिथिल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याची आग्रही मागणी त्यांनी केली..

नुकसान भरपाई देताना राज्य सरकारचा निकष तीन हेक्टरचा आहे तर केंद्र सरकारचा निकष हा दोन हेक्टरचा आहे. पंचनामे करत असताना नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना कोणताही निकष न लावता सरसकट भरपाई द्यावी.तसेच तातडीची मदत म्हणून मदत पुनर्वसन खात्याच्या आदेशानुसार हेक्टरी मदतीच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली..