काँग्रेस नेते आणि NSUI चे प्रभारी कन्हैया कुमार हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कन्हैया कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या गौरवशाली इतिहासाचं तोंडभरून कौतुक केलं. महाराष्ट्राची भूमी ही संत महात्म्यांची भूमी आहे. ज्यावेळी देशभरात इंग्रजांविरुद्ध ब्र काढण्याचीही कोणाची हिंमत नव्हती, त्यावेळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ ही गर्जना महाराष्ट्रातूनच देशभरात दुमदुमली होती. वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीरांची ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहीत धरण्याचं काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे. पण मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच धास्तीपोटी हे सरकार निवडणुका घेत नसल्याचं मत कन्हैया कुमार यांनी व्यक्त केलं.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच कन्हैया यांनी मुंबईने आपल्याला किती भरभरून दिलं आहे, याची आठवण सांगितली. आपल्या मुंबई दौऱ्यात विविध कार्यक्रमांना पोलिसांकडून आडकाठी केली जात आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. ठरावीक नेत्यांचे तळवे चाटणे म्हणजे देशसेवा आहे, अशी धारणा आजकाल झाली. पण या नेत्यांचे पगार, भत्ते लोकांनी भरलेल्या करातून निघतात. त्यामुळे हे लोक सामान्य जनतेला उत्तरदायी आहेत, हे त्यांना विसरून चालणार नाही, अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली.

हेही वाचा- “एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहणार”, फडणवीसांनी सांगितला ‘प्लॅन बी’, म्हणाले…

काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपाचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा खोचक टोलाही कन्हैय्या कुमार यांनी लगावला.

हेही वाचा- “देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे…”; मुंबईत काँग्रेस नेत्यानं उडवली खिल्ली, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मुंबईचा वाटा खूप मोलाचा आहे. पण आज हीच मुंबई पंतप्रधानांच्या मित्राला (गौतम अदाणी) आंदण देण्याची तयारी केंद्र आणि राज्य सरकारकडून केली जात आहे, अशी टीका युवा नेते कन्हैय्या कुमार यांनी केली. NSUI चे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेल्या कन्हैय्या कुमार यांनी देशात वाढलेली प्रचंड बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी गोष्टींवर सडकून टीका केली.