कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकरवी अग्रीम (टोकन) वाटप सुरू आहे. ही चुकीची पद्धत आहे, असे माजी आमदार महादेव महाडिक यांनी म्हणणे हा सर्वांत मोठा विनोद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पैशाचे राजकारण त्यांनीच प्रथम आणले, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
गोकुळचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे संचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून महाडिक कुटुंबीय आणि महायुतीतील नेते टीका करत असले, तरी त्यांच्यात ‘तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना’ अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याकडे लक्ष वेधले असता, आमदार पाटील म्हणाले, की पी. एन. पाटील यांनी काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केला नाही. त्यांची दोन्ही मुले उद्या मला भेटण्यासाठी येणार आहेत. त्यांची समजूत काढली जाईल.
आमदारांच्या डोक्यावर बंदूक
शक्तिपीठ महामार्गाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी समर्थन चालवले असले, तरी खासगीत ते याबाबत अधिक विस्तृतपणे सांगतील. शक्तिपीठ समर्थनार्थ सातबारा उतारे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले असतील, तर त्या विरोधात इतक्या हरकती आल्याच नसत्या. ‘शक्तिपीठ’च्या समर्थनात आंदोलन करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर व शिवाजी पाटील यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली गेली आहे, असा खळबळजनक आरोप सतेज पाटील यांनी केला.
दरम्यान, विधानसभेचे दोन्ही अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विना पार पडले. विधानसभा विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात अध्यक्ष योग्य वेळी निर्णय घेतील. आता योग्य वेळ कधी येणार. यासाठी आता दाते पंचांग बघायचे काय, असा उपवासात्मक टोला पाटील यांनी लागावला.छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचाही आमदार पाटील यांनी निषेध केला. सरकार विरोधात कोणी बोलाल त्याला आम्ही असेच उत्तर देऊ अशा पद्धतीने दहशत पसरवण्यचे काम सुरु आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा नव्हता.
लोकशाहीमध्ये हे चालणार नाही. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे ज्या पद्धतीने व्हिडिओ बाहेर आलेत ते पाहता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आता भाजपला संपलेली आहे. अशी धारणा भाजपची झालेली आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.