मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतांची झालेली फाटाफूट आणि विश्वासदर्शक ठरावावेळी ११ आमदारांची अनुपस्थिती याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून गुरुवारी माहिती घेतली. विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत सात मते फुटल्याने पक्षाचे दोनपैकी पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तसेच नुकत्याच झालेल्या शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षाचे ११ आमदार अनुपस्थित होते. या दोन्ही घटनांची पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने दखल घेतली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत चर्चेसाठी पाचारण केले होते. तेव्हा राहुल गांधी, प्रियंका गांधी, वेणुगोपाळ उपस्थित होते.

विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी माजी आमदार अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार विलंबाने पोहचले. दोन आमदारांनी अनुपस्थितीबद्दल आधी पक्षाची परवानगी घेतली होती. या आमदारांच्या अनुपस्थितीबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या आमदारांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविला जाणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत पक्षाची  सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले. याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.  

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यास  पाठिंबा दिल्याबद्दल पक्षाच्या काही अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी दिल्लीत तक्रार केली आहे. नामांतराबाबत पक्षात काहीच चर्चा न होता पाठिंबा कसा देण्यात आला, असा सवाल माजी मंत्री नसीम खान यांनी केला.

राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. पक्ष संघटना बळकट करण्याबाबत आढावा घेण्यात आल्याचे पटोले यांनी सांगितले.