२०१९मध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं ८० दिवसांचं सरकार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारनं कारभार सुरू केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांचं राज्यात सरकार आलं. मात्र, सुरुवातीपासूनच विरोधकांकडून टीका केली गेली त्याप्रमाणे सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये वेळोवेळी मतभेद असल्याचं समोर आलं आहे. विशेषत: काँग्रेसकडून वारंवार यासंदर्भात जाहीर भूमिका देखील घेतल्या गेल्या. हे मतभेद अजूनही कमी झाले नसल्याचच लोकसत्ता डॉट कॉमनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घेतलेल्या खणखणीत मुलाखतीमधून समोर आलं आहे.

जमाना खुद हम से है, हम…!

नाना पटोले यांच्या या भूमिकेवरून राज कुमार यांच्या गाजलेल्या “जमाना खुद हमसे है, जमाने से हम नही”, या संवादाची आठवण व्हावी! राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचं स्थान याविषयी बोलताना नाना पटोलेंनी तितक्याच सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडली. “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं ते म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचं सत्तेतील स्थान, २०२४च्या निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती, केंद्रीय अध्यक्षपदाचा तिढा, युपीएच्या अध्यक्षपदाविषयी संजय राऊतांनी केलेली विधानं असा अनेक अडचणीच्या मुद्द्यांना नाना पटोले यांनी त्यांच्या खास शैलीत सडेतोड उत्तरं दिली. यासोबतच, तिन्ही पक्षांचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर ठरवण्यात आलेल्या किमान समान कार्यक्रमाचं नक्की राज्यात काय झालंय? समन्वय ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीमध्येच समन्वय आहे किंवा नाही? यावर देखील नाना पटोले यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.