scorecardresearch

“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”

देशात सध्या लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचं काम सुरु, नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका

“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”
देशात सध्या लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचं काम सुरु, नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका

नागपूरचा गणवेश घातला की थेट संयुक्त सचिव होता येतं असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. देशात सध्या लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचं काम सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. बुलढाण्यातील भीमशक्ती कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी केलेल्या या टीकेची सध्या चर्चा असून, भाजपानेही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले आहेत?

“सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माध्यमांसमोर येऊन आम्हाला वाचवा असं सांगतात. आता न्यायव्यवस्थाही धोक्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वन अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. आता तर युपीएससीची परीक्षा नाही, नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो असं चित्र आपण पाहत आहोत,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

भाजपाचं प्रत्युत्तर

नाना पटोलेंच्या विधानावर भाजपा नेते राम कदम यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “जेव्हापासून सरकार गेलं आहे तेव्हापासून फक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नव्हे, तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आपण काय बोलत आहोत याचंही त्यांना भान राहिलेलं नाही. वसुली कार्यक्रम, बदल्यांचे पैसे, कमिशन मिळणं बंद झालं आहे, त्यात माध्यमंही त्यांना विचारत नाहीत. त्यामुळे माध्यमांमध्ये कशाप्रकारे यायला मिळेल यासाठी अशी विधानं करतात”.

“ज्या अन्नामागे हिंसा असते ते खाल्लं तर…”, सरसंघचालक मोहन भागवतांनी मांसाहार करणाऱ्यांना दिला सल्ला

“हाफ पँटचं इतकं कौतुक असेल तर एकदा संघाच्या शाखेत यावं, म्हणजे त्यांना देशप्रेम, समर्पित भाव आणि प्रसिद्धीपासून दूर राहून कसं झिजायचं असतं हे कळेल. आयुष्यात वसुलीच्या पुढे कार्यक्रम केला नाही, हिंदूंचा द्वेष केला, भारताच्या आधी आपला पक्ष अशी भूमिका असणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून फार अपेक्षा नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले “एवढंच जर संघावषियी बोलायचं असेल तर संघाच्या शाखेत जा. तिथे गेल्यानंतर अश्रू ढाळत आत्तापर्यंत मी चुकीच्या वाटेवर होतो असं सांगाल”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या